महाराष्ट्र पोलिस दल देशात सर्वोत्तम: देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा समारोप
राज्य राखीव पोलिस बल क्र.2 मैदान वानवडी येथे आयोजित 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा-2023 च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.पुणे : महाराष्ट्राच्या पोलिस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलिस दल म्हणून पाहिले जाते. राज्यात पोलिस दलाकडून उत्तमप्रकारे कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्याने राज्य प्रगतीकडे जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य राखीव पोलिस बल क्र.2 मैदान वानवडी येथे आयोजित 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा-2023 च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, मेघना बोर्डीकर साकोरे, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलिस महासंचालक तथा गृह रक्षक दलाचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलिस महासंचालक संजय कुमार, अपर पोलिस महासंचालक अनुप कुमार सिंग, पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, राज्य राखीव पोलिस दलाचे अपर पोलिस महासंचालक चिरंजीवी प्रसाद आदी उपस्थित होते.
अनेक चांगल्या परंपरा महाराष्ट्राच्या पोलिस दलाने कायम केल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, 'कायदा व सुव्यवस्था राखण्यासह लोकशाहीची मूल्ये जपण्याकरिता पोलिस दल कार्यरत आहे. विपरीत परिस्थितीत पोलिस कर्मचारी काम करतात. पोलिसांनी कोरोना काळात जीवनाची जोखीम पत्करून प्रचंड काम केले. त्यादरम्यान काही पोलिसांना शहीद व्हावे लागले. अशाही परिस्थितीत सामान्य माणसाचे जीवन सुकर व्हावे यासाठी पोलिस दलाने काम केले.'
पोलिस दलासाठी पुणे येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल...
2019 मध्ये पुण्यात पोलिस दलातील खेळाडूंसाठी चांगले क्रीडा संकुल तयार करण्याचा मनोदय पोलिस महासंचालकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिस विभागाकडून अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल. बालेवाडी येथे खेळासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. पण पोलिसांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यादृष्टीने पायाभूत सुविधांची याठिकाणी व्यवस्था करण्यात येईल.
पोलिस दलातील खेळाडू देशाचे नाव मोठे करतात...
श्री. फडणवीस, 'पोलिस दलातील क्रीडापटूंसाठी या स्पर्धा महत्वाच्या असून त्यातून क्रीडा गुणांना वाव मिळतो आणि राष्ट्रीय स्पर्धेतही आपले क्रीडाकौशल्य दाखविण्याची संधी मिळते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी पदके मिळवतात, देशाचे नाव मोठे करण्याचे काम करतात. अशा खेळाडूंना वाव देण्यासाठी या स्पर्धांना महत्व आहे.'
खेळात जय-पराजय होत असतो शेवटी खिलाडूवृत्ती महत्वाची असते. खिलाडूवृत्ती आत्मसात केल्यास विजय डोक्यात जात नाही आणि पराभवाने निराशा येत नाही. माणूस हरल्यानंतरही जिद्दीने कामाला लागतो. पोलिसांना तणावाचा सामना करावा लागत असल्याने त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी खेळ महत्वाचे आहेत. खेळामुळे शिस्त आणि जिद्द निर्माण हेाते. प्रशिक्षण संचालनालयाने क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून यातून पोलिस दलाला सन्मान मिळवून देणारे चांगले खेळाडू मिळतील, असे श्री. फडणवीस म्हणाले.
पोलिस महासंचालक श्री. सेठ म्हणाले, 'या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या उत्साहात पार पडल्या. पोलिस खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, संघभावना वाढावी, आरोग्य तंदुरुस्त राहावे, मनोबल वाढावे यासाठी या स्पर्धा उपयुक्त आहेत. या स्पर्धेत 6 नवीन विक्रम नोंदले गेले. पुणे येथे 28 एकर जागेत पोलिस क्रीडा संकुल आणि होस्टेल बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे.'
श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. महिला गटात मंजिरी रेवाळे यांनी सुवर्णपदक, प्रियांका फाळके रौप्यपदक आणि नाजुका भोर यांनी कांस्यपदक पटकावले. पुरुष गटात पप्पू तोडकर यांनी सुवर्णपदक, बाबासाहेब मंडलिक यांनी रौप्यपदक आणि मल्लिकार्जुन बिराजदार यांनी कांस्यपदक पटकावले.
स्पर्धेमध्ये पुरुष गटात सर्वाधिक पदके मिळवत राज्य राखीव पोलिस दलाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. प्रशिक्षण संचालनालयाच्या महिला संघाने सर्वाधिक क्रीडा प्रकारात विजेतेपद मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. प्रास्ताविक अनुप कुमार सिंग यांनी केले. आभार पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मानले. यावेळी राज्य राखीव पोलिस बल, प्रशिक्षण केंद्र नानविज येथील प्रशिक्षणार्थीनी नाईट सायलंट आर्म ड्रील या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तत्पूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...
'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616
अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com
महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा-२०२३; पाहा विजेत्यांची नावे...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...