बापरे! प्रवासादरम्यान फोन आला अन् सगळंच संपल...

जातेगाव फाटा येथील न्यू खालसा पंजाबी ढाबा हॉटेल समोर पवार हे रस्त्याचे कडेला दुचाकी उभी करून फोनवर बोलत होते.

पुणे: शिक्रापूर-चाकण रस्त्यावर एका कंटेनरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एका सात महिन्यांच्या चिमुकलीसह तिच्या आई वडिलांचा मृत्यू तर एक बालिका जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशोक दगडू पवार, सारिका अशोक पवार व अनु अशोक पवार अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे कंटेनर चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्रापूर-चाकण रस्त्याने चाकण बाजूने अशोक पवार ते त्यांची पत्नी व दोन मुलींसह त्यांच्या ताब्यातील एम एच १६ झेड ३६०६ या दुचाकीहून येत होते. जातेगाव फाटा येथील न्यू खालसा पंजाबी ढाबा हॉटेल समोर पवार हे रस्त्याचे कडेला दुचाकी उभी करून फोनवर बोलत होते. यावेळी पाठीमागून चाकण बाजूने आलेल्या टी एस ०७ यु एफ ९५५५ या कंटेनरची अशोक पवार यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. पवार हे दुचाकी व कुटुंबियांसह कंटेनरखाली चिरडले गेले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस स्टेशनचे अपघात नियंत्रण पथकाचे अंबादास थोरे, राकेश मळेकर, नीरज पिसाळ, अशोक वनवे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने शिक्रापूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच अनु पवार या सात महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशोक पवार, सारिका पवार, शुभ्रा पवार यांना उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना अशोक पवार व सारिका पवार या पती पत्नींचा मृत्यू झाला आहे.

घडलेल्या घटनेत अशोक दगडू पवार, सारिका अशोक पवार व सात महिन्यांची बालिका अनू अशोक पवार (वय सात महिने, सर्व सध्या रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर जि. पुणे, मूळ रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर) यांचा मृत्यू झाला आहे. शुभ्रा अशोक पवार (वय ३) ही जखमी झाली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे अपघात नियंत्रण पथकाचे अंबादास आश्रुबा थोरे (वय २७ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी कंटेनर चालक बालाजी संजय येलगट्टे (वय २४ वर्षे रा. अंजनगाव ता. अहमदपूर जि. लातूर) याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत कंटेनर चालकाला अटक केली आहे. अपघातातील कंटेनर देखील जप्त केला असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवराम खाडे हे करत आहेत.

Title: pune district crime news truck accident at shikrapur chakan
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे