पुणे शहरात कबड्डीपटू मुलीचा खून; आरोपीला अटक

प्राथमिक तपासातून हा खून एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाल्याचे दिसत आहे. मुलीच्या नातेवाईकांकडे आम्ही चौकशी केली आहे.

पुणे : पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा खून झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ तपासाची सुत्रे फिरवत एकाला अटक केली आहे. ओंकार उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय 21, सध्या रा. चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मुलीचा नातेवाईक आहे.

एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असण्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी शुभम आणि त्याच्या तीन साथीदारांना आज (बुधवार) सकाळी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'खून झालेली मुलगी ही कबड्डीपटू आहे. ती आठवीत शिक्षण घेत होती. मुलगी दररोज संघ्याकाळी यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करण्यासाठी येत होती. मंगळवारी (ता. 12) संध्याकाळी 5 च्या सुमारास कबड्डीचा सराव झाल्यानंतर ती तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती. त्यावेळी आरोपी आणि त्याचे दोन साथीदार तेथे आले. आरोपीने मुलीला बाजूला बोलावून घेतले. त्यावेळी बोलताना त्यांच्यात वादावादी झाली. त्यामध्ये आरोपीने कोयत्याने मुलीवर वार केले. मुलीच्या मैत्रिणींनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीच्या साथीदारांनी त्यांना धमकावले. मुलीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी पळून गेले होते. घटनास्थळी कोयता, दोन तलवारी, सुरा, मिरची पावडर आणि मुलीला धमकावण्यासाठी आणलेले खेळण्यातले पिस्तुल मिळाले आहे. तीन मुख्य आरोपींना आणखी दोघांनी मदत केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयावरुन दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.'

पोलिस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या, ''प्राथमिक तपासातून हा खून एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाल्याचे दिसत आहे. मुलीच्या नातेवाईकांकडे आम्ही चौकशी केली आहे. दीड-दोन वर्षापूर्वी देखील या मुलाने मुलीला त्रास दिला होता. तेव्हा मुलीच्या घरच्यांनी त्याला समज दिली होती. तरी त्याने आज हा प्रकार केला.''

दरम्यान, "बिबवेवाडीतील घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणे हे सामाजिक अधःपतनाचं गंभीर लक्षण असून, ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल," असे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

धक्कादायक! पुणे शहरात मुलीचा कोयत्याने सपासप वार करून खून

Title: pune crime news girl attack and murder at bibwewadi arrested
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे