थराराक! चित्त्याच्या चपळाईने शस्त्रसज्ज आरोपीवर घेतली झेप...

रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे आणि सहाय्यक फौजदार नानासाहेब काळे यांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने पकडले. आरोपीला कसे पकडले याबाबत बलवंत मांडगे सांगताना अंगावर अक्षरशाः काटा उभा राहतो...

शिरुर न्यायालयाच्या परिसरात सात जून रोजी एकाने दोन महिलांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेमध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. पण, गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या काही मिनीटांमध्ये आरोपीला रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे आणि सहाय्यक फौजदार नानासाहेब काळे यांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने पकडले. आरोपीला कसे पकडले याबाबत बलवंत मांडगे सांगताना अंगावर अक्षरशाः काटा उभा राहतो...

शिरूर न्यायालयाच्या आवारात माजी सैनिक दीपक पांडुरंग ढवळे याने गोळीबार केला आणि त्यामध्ये त्याची पत्नी मंजुळा दिपक ढवळे (वय ३५ वर्षे रा. वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहमदनगर) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेची आई तुळजाबाई रंगनाथ झांबरे (वय ५५ वर्षे रा. वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहमदनगर) हि गंभीर जखमी झाली होती. न्यायालयाच्या परिसरात अचानक झालेल्या गोळीबारानंतर नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. नागरिक आरोपीच्या दिशेने दगडफेक करू लागले. पण, आरोपीने नागरिकांना धमकावत हवेत गोळीबार केला आणि रिक्षातून फरार झाला. शिरुर पोलिसांना याबाबतची माहिती समजल्यानंतर त्यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना कळवले. रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी तत्काळ संबंधित माहिती पोलिसांना दिली.

शिरूर न्यायालयात गोळीबार; मम्मी, उठ उठ...’ असा आक्रोश अन्...

पोलिस उपनिरीक्षक देविदास कंरडे, शुभांगी कुटे, पोलिस अंमलदार ब्रम्हा पवार, सहाय्यक फौजदार नानासाहेब काळे, डिस्टिक स्पेशल ब्रँच शिरूर सेंटर, संतोष औटी, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नजिम पठाण, पोलिस अंमलदार रांजेंद्र गोपाळे, प्रविण पिठले, संतोष सांळुंके, विशाल पालवे, सहाय्यक फौजदार अनिल चव्हाण, महिला पोलिस नाईक भाग्यश्री जाधव हे सर्वजण रस्त्याच्या दिशेने धावले. पुणे-नगर रस्त्यावर दोन ठिकाणी तत्काळ नाकाबंदी करण्यात आली.

रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे आणि सहाय्यक फौजदार नानासाहेब काळे हे पोलिसांच्या मोटारीतून आरोपीचा शोध घेत निघाले होते. शिरूर न्यायलायापासून एक व्यक्ती संबंधित रिक्षाचा पाठलाग करत होता. पण, आरोपीकडे पिस्तूल असल्यामुळे पकडण्याचे तो धाडस करत नव्हता. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सरदवाडीजवळील फलके मळा येथे आल्यानंतर त्याने संबंधित व्यक्तीने हिच रिक्षा असल्याचे खुनावले. आम्ही जीवाची पर्वा न करता त्यांनी आरोपीवर झडप घातली. यावेळी आरोपीकडे पिस्तूल होते. शिवाय, तो गोळीबार करू शकला असता. पण बलवंत मांडगे यांचा तीस वर्षाचा पोलिस दलातील अनुभव आणि साडेसहा फुट उंच आणि धिप्पाड असे नानासाहेब काळे यांनी जीवावर उदार होऊन आणि जवळ कोणतेही शस्त्र नसतानाही आरोपीला आपल्या कवेत घेतले. शिरूर न्यायालयातील गोळीबारानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्येच आरोपीला पकडल्यामुळे रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण, आरोपीला पकडण्यात थोडीसी जरी चुक झाली असती तरी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. पण, पोलिसांनी पुढील अनर्थ टाळला आणि आरोपीला चित्त्याच्या चपळाईने जेरबंद केले.

रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्याशी केलेली सविस्तर चर्चा पुढीलप्रमाणेः
प्रश्नः
शिरूर न्यायालयातील घटना कशी समजली?
पोलिस निरीक्षक बलवंत मांडगेः पोलिस चौकीमध्ये काम करत असताना शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचा फोन आला आणि त्यांनी गोळीबार झाल्याची माहिती दिली. शिवाय, आरोपी पुण्याच्या दिशेने निघाला असल्याचे सांगितले. त्याक्षणी उपस्थित पोलिसांना बोलावून घेत माहिती दिली आणि सर्वजण पुणे-नगर रस्त्याच्या दिशेने निघालो. 

प्रश्नः गोळीबाराची माहिती समजल्यानंतर पुढे काय केले?
श्री. मांडगेः
शिरूर न्यायालयात झालेला गोळीबार म्हणजे गंभीर घटना होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि उपस्थितांना तत्काळ माहिती दिली. सर्वजण पुणे-नगर रस्त्यावर दिशेने धावलो. दोन ठिकाणी नाकाबंदी केली. रस्त्यावर मध्ये एक कंटेनर आडवा उभा केला. त्यामुळे पुढे कोणतेही वाहन जाणार नव्हते. पोलिसांच्या मोटारीतून शिरूरच्या दिशेने मी स्वतः आणि नानासाहेब काळे आरोपीच्या शोधात निघालो होतो.

प्रश्नः आरोपीवर झडप कशी घातली?
श्री. मांडगेः
सरदवाडीजवळील फलके मळा येथे एम एच ०५ बि जि ४६५० या रिक्षामध्ये आरोपी असल्याचे पाठलाग करणाऱया व्यक्तीने खुनावले. आरोपीकडे पिस्तूल असल्याची माहिती होती. तो कोणत्याही क्षणी आमच्यावर गोळीबार करू शकला असता. प्रथम आमचे त्याच्या हाताकडे लक्ष गेले. त्याचा हात रिकामा दिसल्यानंतर जीवावर उदार होऊन काही सेंकदात त्याच्यावर मी झडप घातली. त्याला कवेत घेतले. रिक्षाच्या दुसऱया बाजूला त्याच्या बॅगेत पिस्तूल होते. नानासाहेब काळे यांनी ती बॅग ओढली. तो पिस्तूल घेण्याच्या तयारीत होता. पण, रिक्षापासून त्याला बाजूला घेतले आणि काम फत्ते झाले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर ५० मिटर अंतरावर असलेल्या पोलिसांच्या गाडीत बसवले आणि चौकीत घेऊ आलो.

प्रश्नः जिवाची भिती वाटली नाही का?
श्री. मांडगेः
एकतर आरोपी हा माजी सैनिक होता. नुकताच तो निवृत्त झाला होता. त्यामुळे साहजिकच त्याच्याकडे चपळाई होती. शिवाय, तो शस्त्रसज्ज होता. पण, पुढील अनर्थ टाळायचा असेल तर त्याला पकडणे सुद्धा तितकेच गरजेचे होते. विशेष म्हणजे त्याला पकडले त्यावेळी त्याच्याकडे पिस्तूल होते. पण, आमच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते. त्यामुळे आम्ही जिवावर उदार होऊनच त्याच्यावर झडप घातली. त्याला पकडणे हे आमचे कर्तव्य होते. पण, थोडी जरी चूक झाली असती तरी आमच्या जीवाला धोका होता. पण, त्याला पकडण्यात आम्हाला मोठे यश आले. 

प्रश्नः आरोपीची मानसिकता कशी होती?
श्री. मांडगेः
आरोपीला रिक्षातून पकडल्यानतंर तो आमच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडे चपळाई होती. पण, धिप्पाड नानासाहेब काळे आणि माझ्या ताब्यातून तो सुटू शकला नाही. काही वेळातच आमच्या टीम आली आणि त्याला चौकीत घेऊन आलो. चौकीत आल्यानंतर काही वेळानंतर तो शांत झाला.

प्रश्नः पोलिस दलातील अनुभव कामाला आला का?
श्री. मांडगेः
पोलिस नानासाहेब काळे आणि माझा स्वतःचा पोलिस खात्यामधील तीस वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. आरोपींना पकडण्याचा दोघांचाही अनुभव दांडगा आहे. आरोपी जरी लष्करातून निवृत्त झालेला आणि शस्त्रसज्ज असला तरी आमचा अनुभव कामी आला, असेच म्हणावे लागेल.

शिरूर, रांजणगाव पोलिसांचा वरीष्ठांच्या हस्ते सन्मान होणे गरजेचे...

आरोपीने का केला गोळीबार...
लष्करातून निवृत्त झालेला माजी सैनिक दीपक ढवळे याचा पत्नी मंजुळा यांच्याशी कायमच वाद होत होता. मंजुळा ही त्याच्या मामाचीच मुलगी होती. परंतु भांडणाला वैतागून त्या विभक्त राहात होत्या. पोटगीसाठी त्यांनी शिरूर न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर अनेकदा नोटिसा बजावूनही दीपक सुनावणीसाठी हजर राहात नव्हता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी समुपदेशनानंतर मंजुळा या अंबरनाथ येथे सासरी गेल्या. मात्र, दोन-तीन दिवसांतच मारहाण झाल्याने त्यांनी पतीसह सासरच्यांविरूद्ध शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. यानंतर त्यांनी पतीपासून संरक्षणाची मागणी देखील केली होती. पोटगीच्या निकालाची अंतरिम सुनावणी मंगळवारी असल्याने दीपक न्यायालयात आला होता. पत्नीने आज कसे काय आले, असे विचारले असता मी नात्यातील एका लग्नासाठी भावासोबत आलो असल्याचे त्याने सांगितले व तुमच्याशी बोलायचे आहे, असे म्हणत पत्नी, दोन लहान मुली व सासूला न्यायालयाजवळील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या आवारात नेले व तेथेच पत्नीला तीन ते चार गोळ्या घातल्या.

- संतोष धायबर, संपादक
www.policekaka.com
santosh.dhaybar@gmail.com

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: policekaka editor santosh dhaybar interview ranjangaon polic
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे