कारच्या डिकीतून तब्बल दहा गोण्या गुटखा जप्त...
शाहूपुरी पोलिसांनी साताऱ्यात येणाऱ्या एका कारमधून तब्बल दोन लाख रूपयांच्या गुटख्याच्या दहा गोण्या जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, एकजण फरार झाला आहे.कराड : शाहूपुरी पोलिसांनी साताऱ्यात येणाऱ्या एका कारमधून तब्बल दोन लाख रूपयांच्या गुटख्याच्या दहा गोण्या जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, एकजण फरार झाला आहे.
सादिक सिकंदर मुल्ला (वय ३९, रा. शनिवार पेठ, सातारा), अजीम महंमद तांबोळी (वय ३७, रा. जकातवाडी, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अजिम कुरेशी (रा. मंगळवार पेठ, सातारा) हा फरार झाला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सातारा येथील शाहूपुरी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना कराडहून साताऱ्याच्या दिशेने एक कार निघाली होती. पोलिसांनी बोगदा परिसरात ही कार अडविली. कार थांबल्यानंतर पोलिसांनी कारमधील युवकांची चौकशी केली. त्यानंतर कारची डिकी उघडण्यास सांगितले. यावेळी कारमध्ये अजिम कुरेशी हा लघुशंका करून येतो, असे सांगितले. तो तेथून पळून गेला. पोलिसांनी कारची डिकी उघडताच डिकीमध्ये गुटख्याच्या दहा गोण्या आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी कारमधील सादिक मुल्ला व अजीम तांबोळी याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी जकातवाडी येथे तांबोळीच्या घरातूनही गुटख्याचा मोठा साठा जप्त केला.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, पोलिस उपनिरीक्षक बशीर मुल्ला, फौजदार शरद भोसले, लैलेश फडतरे, अमित माने, ओंकार यादव, स्वप्नील कुंभार, अजित कर्णे, स्वप्नील पवार यांनी केली आहे.