हरवलेले तब्बल २१ मोबाईल केले परत... लोणीकंद सायबर तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी
लोणीकंद सायबर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विविध भागांतून तब्बल २१ मोबाईल हस्तगत करुन ते मूळ मालकांना परत केले.लोणीकंद : चोरीला गेलेला मोबाईल सहज सापडणे अवघडच... अनेकदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करूनदेखील मोबाईल सापडेलच याची खात्री नसते. लोणीकंद पोलिस ठाण्यात विविध तक्रारदारांनी त्यांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. लोणीकंद सायबर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विविध भागांतून तब्बल २१ मोबाईल हस्तगत करुन ते मूळ मालकांना परत केले. हरवलेला मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी लोणीकंद सायबर तपास पथकाचे आभार मानले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीतील विविध तक्रारदारांनी त्यांचे मोबाईल हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद केली होती. या तक्रारींची दखल घेऊन हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेऊन, ते हस्तगत करण्याबाबतचे आदेश वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी लोणीकंद सायबर तपास पथकास दिले होते.
लोणीकंद सायबर तपास पथकाने हरवलेल्या मोबाईलबाबत अधिक माहिती घेऊन तसेच तांत्रिक विश्लेषण करुन, विविध भागांतून एकूण २१ अॅप्पल, सॅमसंग, वन प्लस, व्हिवो, ओप्पो, रिअल मी, एम आय... अशा विविध कंपन्यांचे मोबाईल फोन हस्तगत केले. पोलिस उपायुक्त (परिमंडळ- ४) शशिकांत बोराटे यांच्या हस्ते तक्रारदारांना त्यांचे हरवलेले मोबाईल सुपूर्त करण्यात आले. या कामगिरीबद्दल तक्रारदारांनी लोणीकंद सायबर तपास पथकाचे आभार मानले.
ही कौतुकास्पद कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ ४) शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव, लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस स्टेशन सायबर तपास पथक
प्रमुख पोलिस उप निरीक्षक सूरज किरण गोरे, पोलिस अंमलदार समीर पिलाणे, सागर पाटील, महिला पोलिस अंमलदार किर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांनी केली आहे.