पत्नी, मुलावर उद्योजकाचा जीवघेणा हल्ला... काही वेळातच गूढ मृत्यू... काय आहे प्रकरण?
एका ५७ वर्षीय उद्योजकाने स्वतःच्याच पत्नी व मुलावर जीवघेणा हल्ला केला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसलळे. मात्र, या घटनेनंतर काही वेळातच या वृद्धाचा गूढरित्या मृत्यू झाला.नाशिक : एका ५७ वर्षीय उद्योजकाने स्वतःच्याच पत्नी व मुलावर जीवघेणा हल्ला केला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसलळे. मात्र, या घटनेनंतर काही वेळातच या वृद्धाचा गूढरित्या मृत्यू झाला. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.
नाशिकमधील उच्चभ्रू वसाहत अशी ओळख असलेल्या अश्विननगरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष कौशिक असं या घटनेत मृत्यू झालेल्या वृद्धाचं नाव आहे. ते आपली पत्नी ज्योती व मुलगा देव कौशिक याच्यासोबत अश्विननगरमध्ये राहात होते. आशिष कौशिक हे उद्योजक असून, पत्नी ज्योती व मुलगा देव याच्यासह ते नाशिकच्या अश्विननगरमधील शिव बंगल्यात राहत होते. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मुलगा देव आपल्या खोलीत झोपला होता. याचवेळी त्याच्या उजव्या हातावर हत्यारानं वार झाल्यानं तो जागा झाला. त्यावेळी त्याच्या वडिलांच्या हातामध्ये चाकू होता आणि ते त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती त्यांचा मुलगा देव याने दिली. त्यानंतर देव याने वडिलांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली व आईच्या खोलीत जाऊन दार आतून बंद केले. मात्र त्याला आपली आई ज्योती देखील जखमी अवस्थेमध्ये पलंगावर पडलेली आढळून आली. गादी रक्ताने माखली होती, असं देव याने सांगितलं.
देवने घडलेला प्रकार त्यांच्या घरी काम करणारे अनिल नेगी तसेच वडिलांचे मित्र नारायण विंचूरकर व श्रीरंग सारडा यांना फोन करून सांगितला. त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आशिष कौशिक हे जखमी अवस्थेमध्ये जमीनीवर पडलेले त्यांना आढळून आले. त्यांनी देव व त्याची आई यांना उपचारासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये तर आशिष कौशिक यांना सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तोपर्यंत आशिष कौशिक यांचा मृत्यू झाला होता. आशिष कौशिक यांनी आत्महत्या केली की काही घातपाताचा प्रकार आहे याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, प्राथमिक तपासात आशिष कौशिक यांच्यावर रक्तदाब , मधुमेह तसेच नकारात्मक विचार करण्याच्या आजारावर उपचार सुरू होते अशी माहिती समोर आली आहे.