रंगपंचमी कालावधीत दोन दिवसांत ५० गुन्हे दाखल... लातूर पोलिसांची कामगिरी

अवैध दारु, जुगार धंद्यांवर छापेमारी, ८ लाख ४५ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

रंगपंचमी कालावधीत दोन दिवसांत लातूर पोलिसांनी अवैध दारु, जुगार धंद्यांवर छापेमारी करून ५८ व्यक्तींविरोधात तब्बल ५० गुन्हे दाखल केले. या छापेमारीत एकूण ८ लाख ४५ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लातूर : रंगपंचमी कालावधीत दोन दिवसांत लातूर पोलिसांनी अवैध दारु, जुगार धंद्यांवर छापेमारी करून ५८ व्यक्तींविरोधात तब्बल ५० गुन्हे दाखल केले. या छापेमारीत एकूण ८ लाख ४५ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध दारूविक्री व जुगारावर छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने लातूर जिल्हाअंतर्गत येणाऱ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे स्तरावर पोलिस अधिकारी, अंमलदारांची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांद्वारे अवैध धंद्यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली.

११ व १२ मार्च या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे हद्दीतील देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय, हातभट्टीची निर्मिती करणाऱ्या अवैध धंद्यासंदर्भात पथकांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर लातूर पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी छापेमारी करून देशी दारूची अवैध व विनापास चोरटी विक्री व्यवसाय, हातभट्टीची निर्मिती करीत असताना, देशी विदेशी दारूचा अवैध विक्रीसाठी साठा करून ठेवलेल्या ४८ व्यक्तींविरोधात दारूबंदी कायद्याअंतर्गत ४७ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून 3 लाख ४ हजार ५९५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार कायद्याअंतर्गत १० व्यक्तींविरोधात ३ गुन्हे दाखल दाखल करून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ५ लाख ४० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून ११ व १२ मार्च असे दोन दिवस चाललेल्या कारवाईत दारूबंदी व जुगार कायद्याअंतर्गत एकूण ५८ जणांविरोधात ५० गुन्हे दाखल करून, १३६४ देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच २६८ लिटर हातभट्टी, जुगाराचे साहित्य असा एकूण ८ लाख ४५ हजार ४३५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवघ्या दोन दिवसांत लातूर पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध कार्यवाही करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करून, अवैध धंदे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

याच कालावधीत मोटार वाहन कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर रहदारीस अडथळा करणे, इतरांच्या जीवितास धोका होईल अशा पद्धतीने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे या कलमाखाली मोटार वाहन कायद्याअंतर्गत १९ वाहन चालकांवर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक शांतता भंग केल्यावरून अनेक व्यक्तींवर मपोका ११०, ११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

Title: maharashtra crime 50 cases registered during rangapanchami i
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे