भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?

राज्यात भोंगा आणि हनुमान चालिसावरून मोठे राजकारण सुरू आहे. पण, यापेक्षाही राजकीय पक्षांना महागाईचा मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही का?

राज्यात भोंगा आणि हनुमान चालिसावरून मोठे राजकारण सुरू आहे. पण, यापेक्षाही राजकीय पक्षांना महागाईचा मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही का? सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. अनेकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न आहे. लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानीतून जनता अद्यापही बाहेर पडलेली नाही. अनेकांना नोकऱया नाहीत. प्रचंड महागाईपेक्षा भोंगा आणि हनुमान चालिसाचा मुद्दा महत्त्वाचा आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे...

कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. घरातील कर्ते कोरोनाने हिरावले आहेत. अनेक कुटुंब अद्यापही या धक्क्यातून सावरलेली नाहीत. अनेक कुटुंबांना रोजी-रोटीचा प्रश्न आहे. पण, सर्वसामान्य जनतेकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. खरंच, सर्वसामान्य नागरिकांचा वाली कोण आहे की नाही? असा प्रश्न पडतो. सर्वसामान्य नागरिकांना माहित आहे, आपल्याकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही. प्रश्न कोणी सोडवत नाहीत... आजही किती तरी कुटुंबे अर्धेपोटी झोपत आहेत. कारण, महागाईच तेवढ्या प्रमाणात वाढली आहे. पण, महागाईच्या मुद्यावर बोलणार कोण? सर्वसामान्य नागिरकांची फक्त निवडणूकीच्या वेळी आठवण येते. इतर वेळी त्यांच्याकडे कोणी लक्ष देते का? हा खरा प्रश्न आहे.

पुणे शहरातील येरवडा, सिंहगड रोड, वारजे माळवाडी, कात्रजच्या भागात सकाळी गेल्यानंतर कळते ते पोटाची भूक काय असते ते? हजारो नागरिक रोजी-रोटीसाठी मजुर अड्यावर उभे राहिलेले दिसतात. चिमुकल्यांची भुक भागविण्यासाठी मिळेल ते काम करण्याची तयारी असते. ससून सारख्या सरकारी रुग्णालयात गेल्यानंतर कळते गरीबी काय असते. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न काय असतात. पण, हा मुद्दा कोणी घेत नाही. कारण, एकदा मतदान झाले की संपले... एका ना अनेक असे मुद्दे आहेत. पण, लक्ष देतो कोण. प्रत्येक पक्षाला राजकारणाचे पडलेले आहे. 

एका बाजूला प्रचंड महागाई तर दुसरीकडे अनेकांच्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्या जप्त होत आहेत. फोटोंमधील नोटांची बंडले पाहून डोळे पांढरे होतात. खरंच हे पैसे कष्टाने कमावलेले असतात का? हा प्रश्न पडतो. समाजात केवढी मोठी दरी निर्माण झाली आहे. एका बाजूला प्रचंड गरिबी आणि दुसरीकडे प्रचंड श्रीमंती. पण, गरिबांचे प्रश्न सोडवून मिळणार काय? भ्रष्टाचाराचे तर विचारायलाच नको. जाईल तिथे फक्त आणि फक्त भ्रष्टाचार पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे कोणतेही सरकारी काम वेळेत अथवा पैसे सरकावल्याशिवाय होत नाही. खरोखर, जनता कंटाळली आहे...

कोरोनाने नागरिक तडफडत असताना मंत्री खासगी रुग्णालयात...

इंधन दरवाढ...
पेट्रोल-डिझेल, सीएजी, गॅसच्या दरवाढीचे तर विचारायला नको. दिवसेंदिवस नुसतीच महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेल, सीएजीचे दर पाहिल्यानंतर महागाईचा अंदाज येतो. घरगुती गॅसचे दर वाढल्यामुळे गरिब कुटुंबियांचे गणित कोलमडले आहे. सिलेंडर घ्यावा की नको असा प्रश्न पडत आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू दररोज वाढू लागल्यामुळे जनता अक्षरशः कंटाळली आहे. पण, हा मुद्दा गौण आहे की काय? असा प्रश्न नक्कीच पडत आहे.

शाळेची फी वाढ...
कोरोना आणि लॉकडाऊनचा अनेकांना फटका बसला आहे. बॅंकाचे हप्तेही अद्याप सुरळीत झालेले नाहीत. दुसरीकडे शाळांचे प्रवेश सुरू झालेत. पण, शाळांनी मोठ्या प्रमाणात फी वाढ केली आहे. लॉकडाऊनदरम्यान फीमध्ये सवलत देऊ, असे आश्वासन देण्यात आले. पण, कोणाला सवलत मिळाली? याचा शोध घ्यावा लागेल. शाळांची वाढलेली फी पाहून मुलांना शाळेत घालावे की नाही, असा प्रश्न उभा राहतो. पण, फी वाढीचा मुद्द्यावरही कोणी बोलत नाही. त्यामुळे पालकांना काही करून पैसे भरावेच लागतात. सगळीकडे अंदाधुंदपणा सुरू आहे.

शेतकऱयांचे प्रश्न...
शेतकरय़ांपुढे मोठे प्रश्न उभे आहेत. मालाला बाजार नाही. बी, बियाने, खते प्रचंड महाग झाली आहेत. रात्रं-दिवस काम करूनही मालाला भाव मिळत नाही. शेतकऱयांना वेळेवर वीज मिळत नाही. वीजेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. शेतकरी रात्री-अपरात्री पिकांना पाणी देऊन चार पैसे मिळतील या आशेने काबाडकष्ट करतो. पण, खर्चही निघत नाही. शेतकऱयांपुढे कितीतरी प्रश्न आ वासून उभे आहेत. कर्जबाजारपणाला कंटाळून अनेक शेतकऱयानी जगाचा निरोप घेतला आहे.

खरंच, समाजापुढे कितीतरी प्रश्न उभे आहेत. तळागाळात जाऊन पाहिल्यानंतर किती अडचणी उभ्या असतात, हे कळते. राजकीय पक्षांना त्यांच्या अजेंडानुसार भोंगा, हनुमान चालिसाचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असेलही, याबाबत दुमत नाही. पण, महागाईच्या मुद्द्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. अन्यथा, पुढील परिस्थिती नक्कीच गंभीर असेल...

- संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com

Title: journalist santosh dhaybar write blog about bhonga and hanum
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे