चोराच्या उलट्या बोंबा, म्हणे मोबाईल नव्हे तर साबण ...

'चोराच्या उलट्या बोंबा' या म्हणीचा प्रत्यय देणारी ऑनलाईन फसवणुकीची एक नवीन घटना समोर आली आहे.

कराड (सातारा):  'चोराच्या उलट्या  बोंबा' या म्हणीचा प्रत्यय देणारी ऑनलाईन फसवणुकीची एक नवीन घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयला फसवून हातचलाखीने घरी आलेले पार्सल बदलून आपलीच फसवणूक झाल्याचा कांगावा करणारी  एक टोळी कराड पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

रॉबिन अँथोनी आरोजा (वय 26), किरण अमृत बनसोडे (वय 24), राहूल मच्छिंद्र राठोड (वय 21) रॉकी दिनेश कर्णे (वय 21), गणेश ब्रम्हदेव तिवारी (वय 39) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 2 कार, 1 लॅपटॉप, 8 मोबाईल, 14 वेगवेगळी आधारकार्ड आणि फसवणुकीकरता वापरण्यात येणारे साहित्य तसेच 5 लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यांनी आपले गुन्हे कबूल केल्याचे पोलिस  सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

पोलिसांच्या तपासात यांच्या फसवणुकीची धक्कादायक पद्धत पुढे आली आहे. अटक करण्यात आलेले हे आरोपी  कल्याण, बदलापूर या ठाणे जिल्ह्यातील ठिकाणावरून ऑनलाईन पद्धतीने कराडमधून मोबाईल मागवायचे. ऑनलाईन मोबाईल ठराविक पत्त्यावर आल्यानंतर ते डिलिव्हरी बॉयला अर्धे सुट्टे पैसे द्यायचे.  डिलिव्हरी बॉय पैसे मोजण्यात गुंतले की हे पाच जण मोबाईलचा बॉक्स उघडायचे.  त्यामधून ते मोबाईल काढायचे आणि त्याठिकाणी चालाखीने साबण ठेवायचे. नंतर बॉक्समध्ये साबणच असल्याचं म्हणत आपली फसवणूक झाल्याचा आरडाओरड करायचे. तसेच आता एवढेच पैसे आहेत, असे सांगून डिलिव्हरी बॉयला परत पाठवायचे.

असा झाला उलगडा...
कराड शहरात ऑनलाईनद्वारे मोबाईल मागवून कुरिअर देणाऱ्याची हातचालाखीने फसवणूक करून मोबाईल चोरणाऱ्याचे प्रमाण वाढत होते. त्या चोरांना पकडण्याचे कराड पोलिसांसमोर आव्हान होते. त्यांनी तांत्रिक माहितीचा अभ्यास केला. आपले  तपास कौशल्य पणाला लावले. तपासात आरोपी हे कल्याण, बदलापूर येथील असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार, कराड  शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांनी संशयितांचा शोध घेतला. अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी एकूण १ लाख ६९ हजार ९६७ रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

ही टोळी पकडण्याची कामगिरी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजीत बोऱ्हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांनी केलेली आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: cyber crime news online shoping fraud karad police arrested
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे