बँक मॅनेजरच्या खूनाचे धक्कादायक कारण आले समोर...
स्टेट बँकेच्या मॅनेजर उत्कर्ष पाटील (वय ३६) यांच्या खूनाच्या प्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे.बुलडाणा : हिरडव (ता. लोणार) येथील स्टेट बँकेच्या मॅनेजर उत्कर्ष पाटील (वय ३६) यांच्या खूनाच्या प्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. या संपूर्ण खुनाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावला असून, आरोपीला डोंबिवली येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
बँक मॅनेजरचा खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. खूनामागे विविध तर्कवितर्क लावले जात होते. पण, बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून या खुनाचा छडा लावण्यात आला आहे. बँक मॅनेजर राहत असलेल्या लॉजवरील मॅनेजरनेच पैशांच्या हव्यासापोटी या बँक मॅनेजरचा खून केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला डोंबिवली येथून ताब्यात घेतले आहे.
एक जानेवारी रोजी हिरडव या स्टेट बँकेच्या मॅनेजरचा मृतदेह मेहकर तालुक्यातील सारंगपूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात आढळून आला होता. यावेळी पोलिसांना रक्ताने माखलेला चाकू शिवाय दोन मोबाईल फोन सुद्धा आढळून आले होते. स्थानिक गुन्हे शाखेने तपास चक्र फिरवत मेहकर येथील लॉजवर ज्या ठिकाणी स्टेट बँकेचे मॅनेजर उत्कर्ष पाटील राहत होते. त्या लॉजचा मॅनेजर गणेश देशमाने यानेच बँक मॅनेजरकडे भरपूर पैसे असतील म्हणून बँक मॅनेजरला थर्टी फर्स्ट ची पार्टी साजरी करायला घेऊन जाऊन चाकूने गळा कापून खून केला होता..
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार रस्त्यावरील सारंगपूर फाट्याजवळ असलेल्या उसाच्या शेतात उत्कर्ष पाटील (वय वर्ष 36, राहणार मुंबई) यांचा मृतदेह एक जानेवारीच्या संध्याकाळी आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. उत्कर्ष पाटील हे गेल्या काही दिवसांपासून हिरडव येथील स्टेट बँक मॅनेजर म्हणून काम पाहत होते. चार महिन्यांपूर्वी बदली होऊन उत्कर्ष पाटील बुलढाणा जिल्ह्यात आले होते. शाखा व्यवस्थापक सुट्टीवर असेल तिथे पाटील यांना डेपुटेशनवर पाठवले जात होते. शेवटच्या पंधरा दिवसात ते हिरडव शाखेचा कारभार पाहत होते. त्यांचा परिवार मुंबईत असल्याने ते लॉजवर थांबायचे. स्वभाव अतिशय शांत आणि कमी बोलणारे उत्कर्ष पाटील यांची परिसरात ओळख कमी होती. त्यामुळे त्यांचा खून कोणत्या कारणासाठी केला जाईल, असा सवाल पडला होता.
उत्कर्ष पाटील हे मेहकर शहरातील एका लॉजवर थांबले होते. त्या लॉजवर चिखलीचा गणेश देशमाने मॅनेजर म्हणून काम करायचा. तिथे दोघांचा परिचय झाला. लॉजवरील इतर ग्राहक बाहेर जाताना चावी लॉज काऊंटरवर ठेवायचे. मात्र, पाटील चावी सोबत घेऊन जायचे. त्यामुळे पाटील यांच्याकडे जास्त पैसा असेल, असे गणेश देशमाने याला वाटत होते. त्यामुळे त्यांचा गेम करायचा, असे गणेशने ठरवले होते.
पगार परवडत नसल्याचे कारण पुढे करुन घटनेच्या आठ दिवस आधी गणेशने लॉजवरील नोकरी सोडली होती. मात्र तरी फोनवरून तो गोड गोड बोलून पाटील यांच्या संपर्कात होता. ३१ डिसेंबरला मेहकर शहरातून वाईन शॉपवरून दारू सोबत घेत गणेशने उत्कर्ष पाटील यांना सारंगपूर भागात नेले. तिथेच धारदार शस्त्राने त्याने पाटील यांचा खून केला. मृतदेह शेतातील नाल्यात फेकून त्यावर गाजर गवत टाकून दिले.
पोलिसांना घटनास्थळी दोन मोबाईल सापडले. त्यापैकी एक गणेश देशमाने तर दुसरा पाटील यांचा होता. पाटील यांचा खून झाल्यानंतरही त्यांच्या एटीएम कार्डच्या माध्यमातून दोन वेळा पैसे काढल्याचे समोर आले. या माहितीनंतर पोलिसांनी उत्कर्ष पाटील राहत असलेल्या लॉजवर आणि जेवायला जात असल्या ठिकाणी चौकशी केली. पोलिसांनी गणेश देशमाने याच्या पत्नीचीही चौकशी केली. पाटील यांचा खून केल्यानंतर गणेश मेहकर शहरातील बालाजी नगरात असणाऱ्या त्यांच्या भाड्याच्या घरी आला. घरी कपडे बदलल्यानंतर रक्ताने माखलेली कपडे फेकण्यासाठी त्याची पत्नीही त्याच्यासोबत गेली होती.
डोनगाव रस्त्यावरील क्रीडा संकुलाजवळ कपडे फेकल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ते कपडे ताब्यात घेतले आहेत. खून करून गणेश पसार झाला होता. नुकतेच एलसीबीची धुरा हाती घेतलेल्या अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात एक पथक गणेशच्या मागावर होते. चार जानेवारीच्या संध्याकाळी त्याला डोंबिवली भागातून ताब्यात घेण्यात आल्याचे एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
इंजिनिअर पतीने केला इंजिनिअर पत्नीचा खून; काही महिन्यांचे बाळ पोरके...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.