अमेरिकन पोलिसांकडे एवढी शस्त्रे का असतात? घ्या जाणून...

अमेरिकेतील पोलिसांच्या काही तुकड्या, लष्करातील सैनिकांप्रमाणे शस्त्रसज्ज असतात. त्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह चिलखती वाहने, हेलिकॉप्टर्स आणि ग्रेनेड लाँचर्स अशी संहारक अस्त्रेही पुरविली जातात. परंतु, इतकी शस्त्रसज्जता कशासाठी, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.

वॉशिंग्टन (अमेरिका): अमेरिकेतील पोलिसांच्या काही तुकड्या, लष्करातील सैनिकांप्रमाणे शस्त्रसज्ज असतात. त्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह चिलखती वाहने, हेलिकॉप्टर्स आणि ग्रेनेड लाँचर्स अशी संहारक अस्त्रेही पुरविली जातात. परंतु, इतकी शस्त्रसज्जता कशासाठी, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.

अमेरिकेत सदासर्वकाळ सर्वकाही आलबेल नसते. अधूनमधून तिथेही मोर्चे निघतात, आंदोलने होतात आणि विविध कारणांवरून दंगलीही होतात. काही वेळा शांततेच्या मार्गाने सुरू झालेली आंदोलने हिंसक वळण घेतात. अशा आंदोलनाचा ताजा अनुभव जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय अमेरिकीच्या निधनानंतर आला. मिनिआपोलिस शहरातील एका पोलिस अधिकाऱ्याने, २५ मे रोजी या अधिकाऱ्याने मानेवर ९ मिनिटांपर्यंत गुडघ्याने इतका दाब दिला, की त्यातच फ्लॉईडचा  मृत्यू झाला.

मिनिआपोलिसमध्ये ही बातमी पसरताच मोठी खळबळ उडाली. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. त्यात कृष्णवर्णींयांसोबत श्वेतवर्णीयांची संख्याही तेवढीच मोठी होती. पोलिसांनी अतिरेकी बळाचा वापर केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्याच दिवशी या आंदोलनाचे लोण एखाद्या वणव्याप्रमाणे देशभरात पसरले. पोलिसांनी दंडुकेशाहीचा वापर केल्याचा त्यांचा प्रमुख आरोप होता. जनक्षोभाचा रेटा इतका मोठा होता, की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही हादरले. मात्र, सबुरीने घेण्याचा सल्ला देण्याऐवजी त्यांनी टोकाची भूमिका घेतला आणि अधिक कडक उपाययोजना करून आंदोलन चिरडून टाका, असा आदेश दिला. त्यावर कडी म्हणून, लोकांनी आतापर्यंत कधीच पाहिले किंवा ऐकले नसेल, असे पाऊल उचलणार असल्याचा सज्जड दमही दिला.

न्यू यॉर्कमध्ये पोलिसांनी आंदोलकांची गर्दी पांगविण्यासाठी भक्कम वाहनांचा वापर केला, मिनिआपोलिसमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि टेक्सासमध्ये आंदोलकांवर रबरी काडतुसांचा मारा केला. अर्थात या वस्तूंचा वापर म्हणजे काही लष्करसज्जता निश्चित नाही. 'दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे', ही जी म्हण आहे, ती इथे सार्थ ठरेल. पोलिसांच्या या लष्करी दलाकडे अब्जावधी डॉलर्स किंमतीची सर्वनाशी हत्यारे आणि उपकरणे आहेत. त्यात सुरुंगभेदी वाहनांपासून विमानांपर्यंत आणि ग्रेनेड लाँचर्सपासून अत्याधुनिक रायफल्सपर्यंतच्या साधनांचा समावेश आहे. सन १९९७ पासून संरक्षण खात्यातर्फे पोलिसांच्या या दलाला सुमारे ७.२ अब्ज डॉलर्स किंमतीचे साहित्य पुरविले आहे.

या खर्चावर सार्वत्रिक टीका होऊ लागल्याने, ट्रम्प यांच्या आधीचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१५ मध्ये या खर्चावर नियंत्रण आणले होते. मिशेल ब्राऊन हत्या प्रकरणानंतर उसळलेल्या जनक्षोभाची ही उपरती होती. सत्तेवर आल्यानंतर ट्रम्प यांनी २०१७ मध्ये ओबामा यांचा आदेश फिरवून, पुन्हा मुक्त खर्चाला परवानगी दिली. ताज्या तरतुदीनुसार या शस्त्रसज्ज दलांना नव्याने १.८ अब्ज डॉलर्स खर्चाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अमेरिकी पोलिसांच्या या शस्त्रदलाकडे १,०९९ सुरुंगभेदी वाहने आहेत. त्यांची एकत्रित किंमत सुमारे साडेसात अब्ज डॉलर्स, २,७११ युटिलिटी ट्रक्सची किंमत सुमारे १.८४ अब्ज डॉलर्स आहे. त्याशिवाय विमाने, हेलिकॉप्टर्स, रायफली आणि त्याची काडतुसे आदी अब्जावधि डॉलर्स किंमतीचे साहित्य आहे. अशाच प्रकारच्या साहित्यांचा वापर इराकच्या भूमीवर अमेरिकी लष्कराने केला होता. त्यामुळे अशा वाहनांची आणि शस्त्रांची स्वतःच्या भूमीवर गरज काय, असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे.

खरा प्रश्न आहे, तो या दलांना या अत्याधुनिक शस्त्रसाहित्याची गरज काय? अमेरिकेची एक बाजू जेवढी सुखी आणि संपन्न दिसते, तशीच त्याला दुसरी बाजूही आहे. या संपन्नतेतूनच गुन्हेगारी टोळ्यांनी आपली पाळेमुळे खोलवर रुजविली आहेत. ही गुन्हेगारी उखडून टाकण्याच्या प्रयत्नातला एक भाग म्हणूनच हे साहित्य पोलिसांना देण्यात येत आहे. मात्र, तरीही गुन्हेगारी जगतावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही, असे अमेरिकन इकॉनॉमिक जर्नलने एका लेखात म्हटले आहे.

Title: why do american police have such powerful weapons for
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे