पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलगी परतली घरी

पुणे पोलिसांमुळे एक अल्पवयीन मुलगी तिच्या घरी परतली. अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्याचा कोंढवा पोलिसांनी तात्काळ छडा लावला आहे. मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुणे : पुणे पोलिसांमुळे एक अल्पवयीन मुलगी तिच्या घरी परतली. अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्याचा कोंढवा पोलिसांनी तात्काळ छडा लावला आहे. मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीने संबंधित मुलीला फुस लावून घरातील दागिने घेऊन बोलावले होते. हे दागिने त्याने एका सराफाकडे गहाण ठेवले होते.

विनोद राजू सोनवणे (वय २९, रा. भीमनगर, कोंढवा खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, कोंढवा पोलिस ठाण्यातील दिपक क्षीरसागर यांना आरोपी मुलीला घेऊन समता नगर येथे उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक पथक घटनास्थळी रवाना झाले. पण, त्यावेळी मुलगी तेथे नव्हती. आरोपीकडे मुलीसंदर्भात विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने मुलीला ब्युटी पार्लरचा व्यवसाय टाकण्याचे आमिष दाखवून पळवून आणल्याचे सांगितले.

आरोपीने अल्पवयीन मुलीला ब्युटी पार्लरचा व्यवसाय करण्यासाठी घरातून येताना आईचे दागिने चोरून आणण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे मुलीने त्याला दागिने आणून दिल्यावर त्याने ते एका सराफाकडे गहाण ठेऊन पैसे घेतले होते. या पैशतून त्याला स्वत:चा उदरनिर्वाह चालवायचा होता. तो सध्या बेरोजगार आहे. उत्पन्नाचा काही मार्ग नसल्याने त्याने हा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलिस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिंदे, सहायक पोलिस फौजदार ईक्‍बाल शेख, पोलिस हवालदार सुरेश भापकर, पोलिस नाईक गणेश आगम, पोलिस शिपाई दिपक क्षिरसागर यांच्या पथकाने केली.

Title: the girl returned home due to temporary pune police interven
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे