वारंवार नापास झालो, पण फौजदार झालोच!

नापास झाला, म्हणजे संपला..! अशीच काहीशी मानसिकता युवकांची होते. त्यांच्या कुटुंबीयांचीही होते. पण, अनेक परीक्षांमध्ये वारंवार नापास होऊनही अत्यंत कष्टाने, चिकाटीने आणि सातत्याने यशाला गवसणी घालता येते, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, फौजदार सोमनाथ वाघमोडे यांनी. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असाच आहे...
प्रत्येक मराठी युवकाचं पोलिस खात्यात जाण्याचं स्वप्न असतं. त्यासाठी ते धडपडत असतात. अनेकांना त्यात अपयश आलं की, नैराश्यग्रस्त होतात. अशा अपयशी तरुणांपुढं फौजदार सोमनाथ वाघमोडे या फौजदाराने आदर्श उभा केला आहे. दहावी, बारावी, आणि स्पर्धा परीक्षा वारंवार नापास होऊनही जिद्द न हारता या तरुणाने यशाला गवसणी घातली आहे. २००० मध्ये पोलिस दलात खेळाडू म्हणून भरती झालेल्या पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांची संघर्षमय
कहाणी फारच रंजक आहे.

माथी नापासाचा शिक्का!

वाघमोडे यांचे प्राथमिक शिक्षण पाथर्डी तालुक्यातील छोट्याशा खेडेगावात झाले. त्यांचे पहिली ते चौथीचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तर, पाचवी ते दहावीचे शिक्षण जनता विद्यालय, पाथर्डी येथे झाले. गाव ते तालुका हे दूरचे अंतर ते पायी शाळेत जायचे. दहावीमध्ये ते इंग्रजी विषयात थोड्या मार्कांनी नापास झाले. सोमनाथ वाघमोडे सांगतात, ''माझ्या अपयशाची मालिका खर तरं इथूनच सुरू झाली. त्यानंतर मार्च, ऑक्टोबर महिन्यात 'रिपिटर'च्या परीक्षा द्यायचो. अशा सलग चार परीक्षांमध्ये मी नापासाचा शिक्का माथी मारून घेतला. हा शिक्षणाच्या लायकीचा नाही, असे घरच्यांनी ठरवूनच टाकले. त्यामुळे वैतागून एका टेलरकडे कपडे शिवणे शिकण्यासाठी गेलो. त्याने प्रथम साफसफाईची कामे सांगितली, ती करू लागलो.

बेकारीत शिकलो शिवणकाम...

माझा प्रामाणिकपणा पाहून त्या टेलरने मला कपडे शिवायला शिकवले. आणि काही दिवसांतच मी चांगला कपडे शिकणारा कारागीरझालो. दरम्यान, गावातील इतर पोरांसोबत तालमीत जाऊ लागली. तालमीतील व्यायामाचा नादच लागला.
टेलरकडे एक शर्ट शिवला तर, सात रुपये मिळायचे. पॅंटसाठी २१ रुपये मिळायचे. त्यामुळे घरचेही समाधानी होते. हे सर्व करत असताना अभ्यास करून 'रिपिटर'ची परीक्षा दिली आणि चांगल्या मार्कांनी पास झालो. दहावी पास झाल्याने पुन्हा महाविद्यालयात प्रवेश घेतला. अकरावी पूर्ण केली आणि बारावीत पुन्हा घोडं अडलं. तब्बल चौथ्यांदा परीक्षा देऊन पास झालो. दिवसा टेलरिंग काम आणि सायंकाळी तालीम सुरूच होती. शरीरयष्टीही चांगली तयार झाली होती. एका वर्षी गावातील यात्रेमधील कुस्त्यांचा फड गाजवला. अनेक मल्लांना अस्मान दाखवलं. वडील खूष झाले. त्यांनी खुराकाच्या दुधासाठी म्हैस घेऊन दिली. कुस्तीसाठी घरातून पाठबळ मिळू लागले.

ना ओळख, ना वशिला...

त्यानंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर प्रथम वर्षाला आंतर शालेय स्पर्धांमध्ये खेळात भाग घ्यायला सुरुवात केली. कबड्डी, कुस्ती, पॉवर लिफ्टिंग या स्पर्धांमध्ये सातत्याने भाग घेतला. दुसऱ्या वर्षात असताना पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकही पटकाविला. त्याच दरम्यान पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली अन् पोलिस भरतीसाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. कुणाशीही, कुठलीही ओळख नसताना मुंबईला हेलपाटे मारू लागलो. स्टेशनवर झोपून दुसऱ्या दिवशी भरतीच्या परीक्षा देऊ लागलो. अखेर पोलिस खात्यात शिपाई म्हणून भरती झालो.

अखेर फौजदार झालोच!

भरती झाल्यानंतर मरोळ ट्रेनिंग सेंटरला प्रशिक्षण पूर्ण केलं. नवी मुंबईतील उरण पोलिस स्टेशनला पोलिस शिपाई म्हणून नोकरी करू लागलो. दरम्यान पोलिस खात्यांतर्गत खेळाडू म्हणून क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. मुंबईमध्ये काम करत असताना २००८मध्ये पोलिस खात्यांर्गत परीक्षा देण्याचे ठरविले. त्यानुसार अभ्यास करत परीक्षा देणे सुरु केले. पुन्हा पहिल्या प्रयत्नात केवळ एका गुणाने मेरीट हुकले. दुसऱ्या प्रयत्नात सर्व परीक्षा पास झालो, पण सहा गुणांनी मेरीट हुकले. पुन्हा अधिक जोमाने अभ्यास करत तिसरा प्रयत्न केला. तोही फोल ठरला. इथे केवळ दोन गुणांनी ध्येयापासून दूर राहिलो. यावेळी मनाला काहीशी मरगळ आली होती. मित्रही हा नाद सोडून दे, असे सांगू लागले. पण हार मानली नाही. चौथ्यांदा मात्र चांगल्या गुणांनी पास होत पोलिस उपनिरीक्षक झालोच!''
पोलिस उपनिरिक्षकाचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर वाघमोडे यांची कुर्ला पोलिस स्टेशनला प्रोबेशनरी म्हणून नेमणूक झाली. त्या ठिकाणी कार्यकाल पूर्ण केल्यानंतर पुणे ग्रामीणमध्ये शिरूर पोलिस स्टेशनला नेमणूक झाली. या ठिकाणी त्यांनी कामाचा चांगला ठसा उमटविला. सध्या वाघमोडे हे यवत पोलिस स्टेशनला पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम पाहत आहेत.

अपयश ही यशाकडे जाणारी वाट...

वाघमोडे सांगतात, ''या संघर्षाच्या प्रवासात कुटुंबाचे सातत्याने पाठबळ मिळाले. सुख-दु:खाच्या प्रत्येक क्षणी भाऊसाहेब कारंडे या मित्राने मोलाची साथ दिली. मुंबई पोलिस दलात अनेक अधिकारी मार्गदर्शन करत होते. त्यात सहायक पोलिस निरीक्षक सुरेश वारणकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पुणे ग्रामीण मध्ये कार्यरत असताना पोलिस निरीक्षक दयानंद गावडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभल्याने प्रवास सुकर झाला.''
पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांनी अपयशाचा शिक्का कायमचा पुसला. नोकरी करत असतानाच एम. ए.साठी इतिहास विषय घेऊन त्यात प्रथम क्रमांक मिळविला.
अनेकदा अपयश आल्यानंतर आपण खचून जातो. ध्येयापासून दूर जातो. निराश होतो. परंतु अपयश हे अंतिम कधीच नसते तर, अपयश हीच यशाकडे घेऊन जाणारी वाट असून तरुणांनी ध्येय गाठायचे असेल तर ,अपयश आले तरी खचून न जाता परिस्थितीशी संघर्ष करत जिद्द ठेवली पाहिजे. त्यातून हमखास यश मिळते. पोलिस खात्यात जाण्यासाठी हेच कठीण परिश्रम, सातत्य, जिद्द कायम ठेवावी, असे आवाहन वाघमोडे तरुणांना करतात.

 

Title: psi waghmode success story in police department
प्रतिक्रिया (10)
 
Avhad Laxman Babasaheb
Posted on 8 August, 2020

Jay Hind sir,you are really rough& tough inspiration for rural students, who are trying in competative exams. They will definitly take lot of inspiration and can achieve their goles. Iam sure about it.

Prashant Tangdkar
Posted on 7 August, 2020

Proud off u sir खुप प्रेरणा दिली तुम्ही समाजाला

Kiran avhad
Posted on 7 August, 2020

Jay hind सर Jay hind दादा माझा आदर्श असणारे ,माझे सर पण खर पाहिलं तर माझा दादा करण की आम्हा दोघांचं पण एकच गाव आणि सदैव मला लहान भाऊ समजणारे माझे दादा ... तुम्ही केलेला संघर्ष मी माझ्या डोळ्याने पाहिलेला त्यामुळे दादा तुमच्या बद्दल शब्दात बोलणं अशक्य आहे ...तुम्ही सदैव माझी प्रेरणा रहाल.

Nannor Balasaheb Shivaji
Posted on 17 July, 2020

सर तुम्ही प्रत्येकासाठी Idoll आहात, आम्हाला आपला अभिमान आहे.

Sukhalal Jambhalkar
Posted on 30 June, 2020

खरोखरच कसोटीचे क्षण पार करून नवीन पिढीला दिशा देणारे आपले कौशल्य नवी उमेद निर्माण करण्यासाठी एकदिशा देणारे माहिती समोर आणली ़़़़़खरचखुप छान माहिती दिली. फार आभार आहे.

इरफान पठाण
Posted on 29 June, 2020

मा. सोमनाथ दादा हे आमच्या म्हणजे मोहरी गावचे आहेत, त्यांच्या कर्तृत्ववाचा गावातील प्रत्येक तरुणावर एवढा परिणाम आहे की ते गावात आल्यावर त्यांच्या सोबत तासांनतास बोलण्यासाठी गर्दी करून असतात, यासोबतच त्यांचे गावातील सामाजिक कामांसाठी सर्वात आधी नंबर लागतो. आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे सोमनाथ दादा

Kailas yamgar
Posted on 29 June, 2020

PSI SOMNATH SIR IS MY RELATIVE WE CALL THEM SOMA TATYA .I HAD SEEN FROM MY CHILDHOOD STAGE HE ACHIEVE HIS SUCCESS WITH IN VERY DIFFICULT SITUATION BUT I SAY HE IS A SUCCESSFUL PERSON ONLY BECAUSE OF HARDWORK AND THEIR CONVICTION .I WISH THEM A VERY SUCCESSFUL JOURNEY AHEAD

ganesh salunke
Posted on 29 June, 2020

सर तुमचा आदर्श घेऊन सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुलांना प्रेरणा नक्कीच मिळेल... अभिनंदन साहेब

Ashok kharat
Posted on 29 June, 2020

Saheb aapan khup Ziddi want aahe

Balasaheb Dhondiba Asawale
Posted on 29 June, 2020

जिद्द्, चिकाटी, व प्रयत्न केले तर यश मिळतेच. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. प्रयत्नांती परमेश्वर . साहेब आपणास पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा . आपण लवकरच खात्यांतर्गत पुढील परीक्षा देऊन पी.आय. व्हाल अशा सदिच्छा, शुभेच्छा.

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे