पोलिसांनी अवघ्या चार तासात मिळवून दिले पैसे...

जगभरात दिवसेंदिवस ऑनलाइन व्यवहाराला महत्व दिले जात आहे. पण, ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. ऑनलाइन व्यवहारात काळजी घेतली नाही किंवा सुरक्षा बाळगली नाही, तर फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. एका प्रकरणामध्ये पोलिसांनी अवघ्या चार तासात छडा लावत तक्रारदाराला पैसे मिळवून दिले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय.

पुणे: जगभरात दिवसेंदिवस ऑनलाइन व्यवहाराला महत्व दिले जात आहे. पण, ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. ऑनलाइन व्यवहारात काळजी घेतली नाही किंवा सुरक्षा बाळगली नाही, तर फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. एका प्रकरणामध्ये पोलिसांनी अवघ्या चार तासात छडा लावत तक्रारदाराला पैसे मिळवून दिले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय.

चिखलीतील निलेश माळी या युवकाने थेरगाव पोलिसांत तक्रार दिली होती. निलेश आपल्या नातेवाईकाला 28 हजार रुपये 'फोनपे'ने ट्रान्सफर करत होता. त्यावेळी ते दुसऱ्याच अनोळखी व्यक्तीच्या अकाउंटवर सेंड झाले. जेव्हा त्याने आपल्या नातेवाईकाला पैसे पाठवले म्हणून सांगण्यासाठी फोन केला, तेव्हा त्यांनी पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. पण, निलेशच्या खात्यावरून तर पैसे गेले होते. त्यामुळे त्याला धक्का बसला. मग त्याने ज्या नंबरला पैसे पाठवले होते, त्यावर कॉल करून बघितलं तर दुसऱ्याच अनोळखी व्यक्तीने उचलला. सुरुवातीला एका पुरुषाने फोन उचलला, त्यांनतर महिला बोलली. महिलेने काळेवाडीमध्ये राहत असल्याचे सांगितले. निलेश काळेवाडीत गेल्यानंतर परत फोन केला तर महिलेनं फोन उचलला नाही. अनेक वेळा फोन केला नंतर मोबाईल बंद करण्यात आला. यामुळे निलेशच्या पायाखालची मातीच सरकली. अखेर, त्याने थेरगाव पोलिस चौकीत धाव घेतली.

निलेशने तेथील पोलिस हवालदार हरिश्चंद्र पानसरे यांना सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी कसलाही वेळ न दवडता त्या महिलेचा शोध सुरू केला. ती महिला फोन घेत नसल्याने तिला मॅसेज केला. त्यानंतर थोड्या वेळाने महिलेनेच पोलिसांच्या भीतीपोटी फोन केला. त्यावेळी तिने निगडीत राहत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या महिलेला निगडी चौकात यायला सांगितले. तिथे गेल्यावर सुरुवातीला तिने पैसे आलेच नाही म्हणून सांगितले. पोलिसांनी मोबाईल मागितल्यावर तिने नकार दिला. शेवटी पोलिसांनी सज्जड दम दिल्यानंतर मोबाईला दिला. मोबाईल चेक केल्यावर तिच्या अकाउंटवर 28 हजार जमा झाल्याचे आढळून आले. आपलं पितळ उघड पडल्यामुळे त्या महिलेने स्वतःची बाजू सावरण्याचा अतोनात प्रयत्न केला. मला फेक कॉल वाटल्यामुळे मी नाही म्हणाल्याचे महिलेने सांगितले. मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे दाखवल्यानंतर महिलेने पैसे परत केले.

दरम्यान, पोलिसांनी तत्परता दाखवल्यामुळं तक्रारदाराला अवघ्या चार तासांत पैसे परत मिळाले आणि निलेशच्या जीवात जीव आला. त्याने पानसरे यांचे आभार मानले. पानसरे म्हणाले, "ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यायला पाहिजे. माहिती तपासल्याशिवाय कोणत्याही खात्यावर पैसे ट्रान्सफर करू नका. आपली वैयक्तिक माहितीही कुणाला शेअर करू नका." चुकून असा प्रकार होऊ शकतो. अशावेळी तत्काळ जवळच्या पोलिस चौकीत जाऊन माहिती द्यायला हवी.

Title: police constable harishchandra pansare help youth for money
प्रतिक्रिया (1)
 
Sumeet
Posted on 28 June, 2020

Great work.

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे