मित्रांना वाढदिवस साजरा करणे पडले महागात...

कोरेगाव भीमा (ता. शिरूर, पुणे) येथे वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी तब्बल 32 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येथील मारुती मंदिरासमोर रात्रीच्या वेळी काही युवक एकत्र येऊन वाढदिवस करत असल्याची माहिती पोलिस ठाणे अंमलदार पुनाजी जाधव यांना मिळाली होती.

शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरूर, पुणे) येथे वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी तब्बल 32 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येथील मारुती मंदिरासमोर रात्रीच्या वेळी काही युवक एकत्र येऊन वाढदिवस करत असल्याची माहिती पोलिस ठाणे अंमलदार पुनाजी जाधव यांना मिळाली होती. यामुळे वाढदिवस साजरा करायला गेले आणि गुन्ह्यात आडकले, अशी स्थिती मित्रांची झाली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ रानगट, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, ज्ञानदेव गोरे यांनी कोरेगाव भीमा येथे जाऊन पाहणी केली असता त्यांना त्या ठिकाणी केकचे मोकळे खोके पडलेले दिसून आले. त्याचवेळी पोलिसांना शेजारी सीसीटीव्ही कॅमेरा दिसून आला. तेव्हा पोलिसांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला बोलावून सीसीटीव्हीमध्ये पाहणी केली असताना त्यांना त्यामध्ये अनेक युवकांनी गर्दी करून, तोंडावर मास्क परिधान न करता वाढदिवस साजरा केल्याचे निदर्शनास आले.

यावेळी पोलिसांनी गावातील लोकांच्या मदतीने त्या युवकांची नावे संकलित केली. याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अविनाश चांगदेव थोरात (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अजिंक्य टिळेकर, सुभन बन्सीलाल फडतरे, विवेक टिळेकर, तुषार फडतरे, अमर फडतरे, राकेश शिवले, ऋषिकेश रमेश गव्हाणे (सर्व रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर) यांसह अनोळखी पंचवीस जणांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहे.

Title: lock down time friend celebrate birthday at shirur taluka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे