'इंटरपोल' आणि 'डब्लूसीओ' संघटना आल्या एकत्र!

गुन्हेगारी रोखण्यासाठी, २६ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि तस्करी' प्रतिबंधक दिनाच्या पार्श्वभूमीवर 'इंटरपोल' (आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना) आणि 'डब्लूसीओ' (वर्ल्ड कस्टम्स ऑर्गनायझेशन), या दोन आंतरराष्ट्रीय संघटना एकत्र आल्या आहेत.

जिनीव्हा (स्वित्झर्लंड) - कोविड-१९ या विषाणूने जवळजवळ संपूर्ण जगाचा ग्रास घेतला असतानाच, विविद क्षेत्रांतील गुन्हेगारीमध्येही वाढ झालेली दिसते. यातली सर्वांत घातक आणि जागतिक स्तरावर चालू असलेल्या अंमली पदार्थांची तस्करी मानली जाते. अशा प्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी, २६ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि तस्करी' प्रतिबंधक दिनाच्या पार्श्वभूमीवर 'इंटरपोल' (आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना) आणि 'डब्लूसीओ' (वर्ल्ड कस्टम्स ऑर्गनायझेशन), या दोन आंतरराष्ट्रीय संघटना एकत्र आल्या आहेत.

अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिस आणि कस्टम्स खात्यातर्फे, संघटित स्वरूपात असलेली ही तस्करी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या दोन्ही संघटनांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त 'उत्तम सुरक्षेसाठी सखोल माहिती', या तत्त्वांतर्गत दोन्ही संघटना कार्यरत राहणार आहेत. समाजावर, विशेषतः तरुणांवर होणारे त्याचे घातक परिणाम, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न अधिक नेटाने करण्यावर भर देण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी सहकार्य, हा देखिल या दोन्ही संघटना एकत्र येण्यामागचा उद्देश आहे.

कोविड-१९ विषाणूंचा प्रसार रोखण्याचा जगभरातील सर्वच देशांचा अखंडित प्रयत्न चालू आहे. या महामारीमुळे सामाजिक स्वास्थ्य हरपले आहे आणि देशांची अर्थव्यवस्थाही डबघाईला येऊ लागली आहे. विस्कटलेली सामाजिक घडी बसविण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांचे अहर्निश प्रयत्न चालू आहेत. ही संधी समजून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या बेकायदा गुन्हेगारी टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी आपले कुव्यवहार वाढविण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचा क्रमांक बराच वरचा लागतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे. या संघटित टोळ्या, अन्य गुन्हेगारी कारवायांसाठी वित्तपुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे. दहशतवादी कारवायांसाठीही या टोळ्या अर्थपुरवठा करत असतात.

तस्करांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीची बरीच माहिती 'इंटरपोल' आणि 'डब्लूसीओ'ने मिळविली आहे. या टोळ्यांचे आंतरराष्ट्रीय लागेबांधे मजबूत आहेत. त्यासाठीच अशा प्रकारची तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता ओळखून या दोन्ही संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय सीमा संरक्षित करण्याच्या आणि समाजाला या पोखरणाऱ्या किडीपासून रोखण्याचा एकत्रित प्रयत्न करण्यात येणार आहेत.

या प्रसंगी बोलताना 'इंटरपोल'चे सरचिटणीस जर्गेन स्टॉक म्हणाले, की हिंसाचार, भ्रष्टाचार किंवा व्यसनाधीनतेमुळे, अंमली पदार्थ्यांच्या तस्करीने समाजावर आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या घातक परिणाम केले आहेत. कोविड-१९ ने हाहाःकार उडविला असला, तरी तस्करांना त्याचे काहीच सोयरसूतक नाही, असे दिसते.

अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध लढणे हा कस्टम खात्यापुढे एक प्रमुख आव्हान आहे. हे जग अधिक सुंदर आणि सुरक्षित करण्याचा कस्टम खात्याचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आता पोलिस खात्याच्या सहकार्याने, कायद्याचे राज्य आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे 'डब्लूसीओ'चे सरचिटणीस डॉ. कुनिनो मिकुरिया यांनी सांगितले.

Title: interpol and wco organization together
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे