...तरी अन्य देशांनी तुम्हाला आश्रय का द्यावा?

मायदेशात आपला कोंडमारा होतो, अधिक चांगले जीवन जगण्याचा आपल्याला हक्क आहे, अशी काही देशांतील लोकांची मानसिकता बनलेली आहे. अशा प्रकारच्या देशांत एक तर हुकुमशाही असते, किंवा अल्पसंख्याकांवर बहुसंख्याकांकडून अत्याचार होत असतात.

जिनीव्हा (स्वित्झर्लंड) - मायदेशात आपला कोंडमारा होतो, अधिक चांगले जीवन जगण्याचा आपल्याला हक्क आहे, अशी काही देशांतील लोकांची मानसिकता बनलेली आहे. अशा प्रकारच्या देशांत एक तर हुकुमशाही असते, किंवा अल्पसंख्याकांवर बहुसंख्याकांकडून अत्याचार होत असतात. अशा देशांतील लोक साहजिकच अन्य देशांत, जिथे कष्टाला फळ मिळू शकेल, अशा देशांत जाण्याचा प्रयत्न करतात. तथापि, तुम्ही कितीही गांजलेले असलात, तरी अन्य देशांनी तुम्हाला आश्रय का द्यावा? यातूनच सुरू झाले बेकायदा स्थलांतर. उत्तर अरबस्तानातून युरोपची भूमी जवळ असल्याने, स्थलांतरितांचे लोंढे युरोपीय देशांकडे जाऊ लागले. ही मोठी डोकेदुखी ठरल्याने दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या युरोपीय देशांना तटरक्षक दलांची संख्या वाढवावी लागली. विमानतळांवरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.

युरोपीय किंवा स्थलांतरितांचे लोंढे येणाऱ्या जगभरातील देशांनी कितीही तजवीज केलेली असली, तरी गुन्हेगारी टोळ्या त्यातून पळवाटा अचूकपणे शोधतात. त्यातूनच सुरू झाला एक नवीन व्यवसाय. ऐलतीरावरील लोकांना पैलतीरी पोचविण्याचा. हे अर्थातच बेकायदा स्थलांतरच असते आणि त्यासाठी या टोळ्या विशिष्ट रक्कमही घेतात. मध्ययुगातील गुलामांच्या व्यवसायाचा हा आधुनिक आविष्कार आहे. पीडित नागरिकांच्या देशांत रीतसर दुकाने थाटून होणारा हा व्यवसाय सध्या तेजीत आहे. इच्छित देशांत पोचविल्यानंतर त्यांची जबाबदारी संपते आणि पुढे येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची वेळ स्थलांतरितांवर येते. अशा टोळ्यांना रोखण्याचा अधिकार केवळ त्या देशातील सरकारांना आणि पर्यायाने तिथल्या पोलिसांना आणि 'इंटरपोल' या आंतरराष्ट्रीय पोलिस संघटनेला आहे.

पीडितांच्या हलाखीचा गैरफायदा घेणाऱ्या अशा टोळ्यांना पकडण्यासाठी, इंटरपोल स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेत असते. संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थ आणि गुन्हेगारी प्रतिबंधक विभागाच्या एका अहवालातील नोंदीनुसार, केवळ २०१६ या वर्षात २५ लाख लोकांना जगभरातील विविध देशांत बेकायदा घुसविण्यात आले. या लोकांकडून या टोळ्यांनी सुमारे ७ अब्ज डॉलर्स इतकी रक्कम घेतली होती.

बेकायदा स्थलांतराची या टोळ्यांची कार्यपद्धती जगभर जवळजवळ सारखीच आहे. बनावट कागदपत्रे हा त्यातील महत्त्वाचा भाग. त्यांच्याकडून मिळणाऱ्या मोबदल्याच्या रकमेतून भ्रष्टाचार, दहशतवाद, विविध वस्तूंची तस्करी आणि मानवी तस्करी वाढली आहे. इंटरपोलकडून अशा टोळ्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मात्र, प्रत्यक्ष स्थलांतरितांवर ते कोणतीही कारवाई करू शकत नाहीत. या टोळ्यांचा नायनाट करण्यासाठी इंटरपोलने आपल्या काही अधिकाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे.

जिथे कायदा असतो, तिथे पळवाटा असतातच. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले, तरी ही एक प्रकारची मानवी तस्करी कायमची रोखली जाईल, असे सध्या तरी दिसत नाही.

Title: international people smuggling investigation news
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे